योगसाधनेचे सर्वांत सोपे आणि परिणामकारक अंग म्हणजे सूर्यनमस्कार होय. सूर्यनमस्कार ह्या शब्दातून केवळ सूर्याच्या प्रति नमस्कार एवढाच अर्थ प्रतित होत असला तरी त्याचा अर्थ मोठा गूढ आहे.
सूर्य ही आरोग्याची देवता आहे. शरीर हे मुक्तीचे साधन आहे आणि उत्तम शरीरच मुक्ती प्राप्त करु शकते. रोगी शरीरातून देवत्व कसे प्रकट होईल ? ज्याप्रमाणे बाभळीच्या झाडाला आंब्याची फळे लागत नाहीत किंवा विषातून अमृत तयार होत नाही तद्वतच रोगी शरीरातून मुक्तीची अपेक्षा ठेवणे म्हणजे वेडेपणाच होय. योग साध्य करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानेही युक्ताहार विहारस्य…..असे म्हटले आहे, ते यामुळेच.
असे हे उत्तम आरोग्य लाभण्यासाठी सूर्यनमस्कार हा अगदी साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे. सूर्य ही आपल्या नेत्रांची अधिष्ठात्री देवता आहे तसेच ज्याप्रमाणे सूर्यापासून अनेक किरणे निर्माण होऊन सर्वदिशांना पसरतात त्याप्रमाणे आपल्या नाभीमंडलातून सर्व प्रकारच्या नाड्या शरीरभर पसरलेल्या आहेत. साधारणतः आपल्या शरीरातील सर्व नाड्या सुरू नसतात. बहुतेक नाड्या ह्या रक्तातील पित्त व कफ अडकल्याने बंद असतात किंवा अर्धवट सुरु असतात.
सूर्यनमस्कार करताना प्रामुख्याने पडणारा ताण हा नाभीस्थानावर पडतो. त्यामुळे शरीरातील सर्व नाड्या मोकळ्या होऊ लागतात. त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढते. रक्ताभिसरण वाढल्यामुळे अंगात उत्साह संचारतो. अशातच नाड्यांमधील कफ, पित्त बाहेर पडल्याने रक्ताची व नाड्यांची शुद्धी होऊ लागते. बद्धकोष्टता नाहीशी होऊन शरीरात हलकेपणा जाणवायला लागतो. मन आनंदी होते.
योगशास्त्रानुसार आपल्या नाभीस्थानात मणिपूर चक्र असते. सातत्याने केलेल्या सूर्यनमस्कारांमुळे मणिपूर चक्र जागृत होते. त्यामुळे वासनेचे प्रमाण कमी होऊन तिचे रुपांतर बुद्धीमत्तेत होऊ लागते.
शब्दांचे स्पष्टोच्चारण, स्मृती व मेधा वाढणे असे बदल शरीरात व वाणीत दिसू लागतात. मेंदू अधिक गुंतागुंतीची कामे सहजपणे करु लागतो. शरीरातील रक्ताभिसरण सुधारल्याने हृदय नैसर्गिक पणे व स्थिर गतीने कार्य करु लागते.
सूर्यनमस्कारात एकूण बारा योगासनांचा अंतर्भाव आहे. दररोज ताज्या हवेत व प्रकाशात उभे राहून सूर्यनमस्कार करणाऱ्याला उत्तम आरोग्य लाभते यात शंकाच नाही. अगदी दहा पंधरा मिनिटांत बारा गुणिले बारा म्हणजे 144 योगासने सहजपणे केली जातात.
असे म्हणतात की, समर्थ रामदास स्वामी नाशिकला विद्याभ्यास करत असताना रोज 1000 सूर्यनमस्कार करत व नंतर नाभीपर्यंत खोल गोदावरीच्या पात्रात उभे राहून माध्यान्हापर्यंत गायत्रीचा जप करत. यामुळे त्यांचे मणिपूर चक्र व कुंडलिनी जागृत झाली.
अशा ह्या सूर्यनमस्कारांना सर्वांनी अंगिकारावे.
???
3 फेब्रुवारी रथसप्तमी
जागतिक सूर्यनमस्कार दिनाच्या सर्वांना खूप खूप आरोग्यमयी शुभेच्छा
क्रीडाभारती पुणे